pm surya ghar yojana 2024 प्रधानमंत्री सूर्य घर योजना, अर्ज सुरू

pm surya ghar yojana 2024 प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचा लाभ घ्या, महावितरणचे ग्राहकांना आवाहन

pm surya ghar yojana 2024

pm surya ghar yojana 2024

मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशभर सुरू करण्यात आलेल्या ‘प्रधानमंत्री – सूर्यघर मोफत वीज योजनेत तीन किलोवॅट क्षमतेच्या छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून अनुदान देण्यात येत आहे.

या योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थी कुटुंबाला जास्तीत जास्त ७८ हजार रुपयांपर्यंत सबसिडी देण्यात येणार असून वीज ग्राहकांनी या योजनेचा लवकरात लवकर लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी मंगळवारी केले.

मा. उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेची वेगाने अंमलबजावणी करण्याची सूचना महावितरणला केली आहे.

घराच्या छतावर रूफ टॉप सोलर वीजनिर्मिती प्रकल्प बसवून सौरऊर्जेचा वापर करून वीजनिर्मिती करायची व ती वीज घरी वापरून विजेची गरज पूर्ण करायची, अशी ही योजना आहे.

यामध्ये गरजेपेक्षा अधिक वीजनिर्मिती झाल्यावर वीजबिल शून्य येते अर्थात वीज मोफत मिळते व त्यासोबत जास्तीची वीज महावितरणला विकून उत्पन्नही मिळते.

केंद्र सरकारच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने दि. १९ फेब्रुवारी २०२४ रोजी जारी केलेल्या आदेशानुसार रूफ टॉप सोलर सिस्टिम बसविणाऱ्या वीज ग्राहकांना दोन किलोवॅट क्षमतेपर्यंत प्रत्येक किलोवॅटला तीस हजार रुपये अनुदान मिळणार आहे.

तर अधिक एक किलोवॅट म्हणजे तीन किलोवॅट क्षमतेची सिस्टिम बसविणाऱ्या ग्राहकाला एका किलोवॅटला अठरा हजार रुपये अधिकची सबसिडी मिळेल.

अर्थात एक किलोवॅटसाठी तीस हजार रुपये, दोन किलोवॅटसाठी साठ हजार रुपये व तीन किलोवॅटसाठी ७८ हजार रुपये अनुदान केंद्र सरकारकडून थेट मिळेल. वीज ग्राहकांनी कितीही क्षमतेची रूफ टॉप सोलर सिस्टिम बसविली तरी जास्तीत जास्त एकूण अनुदान प्रती ग्राहक ७८ हजार रुपये इतके निश्चित केलेले आहे.

दि. १३ फेब्रुवारी २०२४ नंतर रूफ टॉप सोलर साठीच्या राष्ट्रीय पोर्टलवर अर्ज दाखल केलेल्या सर्व ग्राहकांना केंद्र सरकारकडून नव्या दराने अनुदान मिळेल. महाराष्ट्रात वीज ग्राहकांना रूफ टॉप सोलर सिस्टिम बसविण्यासाठी महावितरण मदत करते.

ग्राहकांनी https://pmsuryaghar.gov.in या राष्ट्रीय पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करणे गरजेचे आहे. पीएम सूर्यघर नावाचे मोबाईल ॲपही यासाठी उपलब्ध आहे. देशभरात एक कोटी घरांसाठी ही योजना सुरू केलेली असून राज्यातील ग्राहकांनी योजनेचा लवकरात लवकर लाभ घ्यावा. एक किलोवॅट क्षमतेच्या रूफ टॉप सोलर सिस्टिममधून दररोज सुमारे चार युनिट अर्थात दरमहा सुमारे १२० युनिट वीज तयार होते. महिना दीडशे युनिटपर्यंत वीज वापर करणाऱ्या कुटुंबाला दोन किलोवॅटपर्यंतच्या क्षमतेची रूफ टॉप सोलर सिस्टिम पुरेशी आहे.

दरमहा दीडशे ते तीनशे युनिट वीज वापर असणाऱ्या कुटुंबासाठी दोन ते तीन किलोवॅट क्षमतेची सिस्टिम पुरेशी ठरते. केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानाच्या आधारे वीज ग्राहकांना रूफ टॉप सोलर सिस्टिम बसविता याव्यात यासाठी महावितरणने यापूर्वीच यशस्वी प्रयत्न केले आहेत.

राज्यात मंगळवार दि. २० फेब्रुवारी २०२४ पर्यंत रुफ टॉप सोलर सिस्टिम बसविलेल्या वीज ग्राहकांची संख्या १,२७,६४६ झाली असून त्यांची एकूण वीजनिर्मिती क्षमता १९०७ मेगावॅट झाली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *