Pikvima yojana 2024 – खरीप व रब्बी पिकांसाठी राज्यात केवळ एक रुपयात पीकविमा योजनेचा लाभ, शासन निर्णय निर्गमित.
एक रुपयात पीक विमा pikvima yojana 2024
प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम २०१६ पासून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार राज्यात राबविण्यात येत आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या मार्गदर्शक सूचनांमधील मुद्दा क्रं. १३.१.१० अन्वये जर राज्य शासन शेतकऱ्यांच्या विमा हप्त्याच्या वाट्याची रक्कम भरणार असेल तर, इलेक्ट्रॉनिक ट्रॅकिंग व नाव नोंदणी सुरळीत करण्यासाठी शेतकऱ्यांमार्फत विमा हप्त्याच्या ऐवजी किमान १ रुपयाचे टोकन अनिवार्यपणे आकारले जाईल.
त्यास अनुलक्षून शासन पुढीलप्रमाणे निर्णय घेत आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजना (PMFBY) खरीप हंगाम 2023 ते रब्बी हंगाम 2025-26 करीता राज्यात राबविणेबाबत.
प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप २०२४ व रब्बी 202४-2५ हंगामातील जिल्हानिहाय व पिकनिहाय क्रॉप कॅलेंडर
एक रुपयात पीक विमा अधिसुचित क्षेत्रातील अधिसुचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक (Area Approach) धरुन केंद्र शासनाच्या वेळोवेळी निर्गमित होणा-या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे खरीप व रब्बी हंगामाकरीता राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे.
एक रुपयात पीक विमा योजना खरीप व रब्बी हंगामाकरिता खालील जोखमीच्या बाबींचा समावेश करुन राबविण्यात येईल:-
१. जोखमीच्या हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थिती मुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान (Prevented Sowing / Planting / Germination),
२. पिकांच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकुल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान (Mid season Adversity).
३. पिक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर, क्षेत्र जलमय होणे, भुस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, किड व रोग इत्यादी बाबींमुळे उत्पन्नात येणारी घट,
४. स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे नुकसान (Localized Calamities). ५. नैसर्गिक कारणांमुळे पिकांचे होणारे काढणीपश्चात नुकसान (Post Harvest Losses)
केंद्र शासनाने प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता हा खरीप हंगामासाठी २ टक्के, रब्बी हंगामासाठी १.५ टक्के तसेच खरीप व रब्बी हंगामातील नगदी पिकांसाठी ५ टक्के असा मर्यादित ठेवला आहे. सर्वसमावेशक पिक विमा योजनेअंतर्गत सदरचा शेतकरी हिस्स्याचा भार सुध्दा शेतक-यांवर न ठेवता शेतकऱ्यांच्या हिस्स्याची विमा हप्ता रक्कम राज्य शासनामार्फत भरणेत येईल. त्यामुळे सन २०२३-२४ पासून शेतक-यांना केवळ १/- रुपया भरून पिक विमा पोर्टलवर नोंदणी करता येईल आणि प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत निश्चित करण्यात आलेली शेतकरी हिस्स्याची पिक निहाय प्रति हेक्टरी विमा हप्ता रक्कम व शेतक-यांनी प्रत्यक्षात भरावयाचा विमा हप्ता रक्कम रु. १/- वजा जाता उर्वरीत फरकाची रक्कम राज्य हिस्सा अनुदान म्हणून राज्य शासनामार्फत अदा करण्यात येईल.
एक रुपयात पीक विमा विमा संरक्षणा साठी समाविष्ट बाबी
पीक पेरणी पासुन काढणी पर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे , गारपीट चक्रीवादळ, पूर ,भुस्खलन, दुष्काळ पावसातील खंड कीड व रोग इ. मुळे पिकांच्या नुकसानीस विमा संरक्षण दिले जाईल.
1- प्रतिकुल हवामान परिस्थितीमुळे पेरणी/लावणी उगवन न होणे.
अपूरा पाऊस, हवामानातील इतर घटकांच्या प्रतिकुल परिस्थितीमुळे अधिसुचित मुख्य पिकांची अधिसुचित क्षेञात व्यापक प्रमाणावर (75 टक्क्यांपेक्षा जास्त ) पेरणी/लावणी न झालेल्या क्षेञासाठी एकुण विमा संरक्षित रक्कमेच्या 25 % विमा pik vima संरक्षण देय राहिल.
2- स्थानिक नैसर्गिक आपत्ती
स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची तसेच चक्रीवादळ, अवेळी पाऊस यामुळे कापणी/ काढणी नंतर सुकवणीसाठी शेतात पसरवून ठेवलेल्या पिकाचे नुकसान झाल्यास सदरची माहिती कर्जदार शेतकऱ्याने 48 तासांत व बिगर कर्जदार शेतकऱ्याने 72 तासांत संबंधित बँक /वित्तीय संस्था/विमा कंपनी यांना देणे आवश्यक आहे.
3- हंगामातील प्रतिकुल परिस्थितीत झालेले नुकसान (Mid Season Adversity )
हंगामातील प्रतिकुल परिस्थिती मुळे माञ काढणीच्या 15 दिवस आधी पर्यंत पूर, पावसातील खंड इत्यादी बाबींमुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षित उत्पादनात मागील 7 वर्षांच्या सरासरी उत्पादनाच्या 50 टक्के पेक्षा जास्त घट असेल तर विमा संरक्षण मिळते.
4- काढणी पश्चात नुकसान post harvesting
चक्रीवादळ, अवेळी पाऊस यामुळे कापणी/ काढणी नंतर सुकवणीसाठी शेतात पसरवून ठेवलेल्या पिकाचे नुकसान झाल्यास वैयक्तिक स्तरावर पंचनामे करुन नुकसान भरपाई निश्चित केली जाईल.
सदरचे नुकसान पिकाची काढणी / कापणी झाल्यानंतर जास्तीत जास्त 14 दिवस नुकसान भरपाईस पाञ राहील.
5- सरासरी उत्पनांवर ( उंबरठा उत्पनावर ) आधारीत नुकसान
पीक कापणी प्रयोगाच्या उत्पन्नावर आलेल्या सरासरीनुसार जर सरासरी उत्पन्न हे उंबरठा उत्पन्नापेक्षा कमी असेल तर त्या प्रमाणात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल.
ई-पिक पाहणी ( e pik pahani ) अंतर्गत पिकांची नोंद करण्यात यावी विमा योजनेत विमा घेतलेले पीक व ई-पीक पाहणी मध्ये नोंदवलेले पीक यामध्ये तफावता असल्यास ई- पीक पाहणीमध्ये नोंदवलेले पीक अंतिम ग्रहित धरण्यात येईल.
पिक कापणी प्रयोग आयोजित करणे तसेच पिकांच्या उत्पन्नाच्या अंदाजासाठी अत्याधुनिक तंञज्ञान उदा. रिमोट सेन्सिंग टेक्नॉलॉजी ( R.S.T.), स्मार्टफोन इ. चा वापर करणे तसेच उपग्रह छायाचिञ, एम. एन. एफ . सी. चे अहवाल व ड्रोन या बाबींचा वापर करण्यात येणार आहे. तसेच सर्व यंञणातील कर्मचाऱ्यांनी पीक कापणी प्रयोग करतांना अॅप वापर करणे बंधनकारक आहे.