Mahareshim 2026 तुती लागवडीसाठी 4.5 लाख रुपयांचे अनुदान; नोंदणी सुरू

Mahareshim Abhiyan 2026 राज्यात सहकार व वस्त्रोद्योग विभागामार्फत ‘महा-रेशीम अभियान 2026’, नवीन तुती लागवडीसाठी नोंदणी सुरू. लागवडीसाठी 4.5 लाख रुपयांचे अनुदान

Mahareshim Abhiyan 2026

राज्यात सहकार व वस्त्रोद्योग विभागामार्फत ‘महा-रेशीम अभियान 2026’ राबविण्यासाठीचा एक शासन निर्णय घेण्यात आला आहे.

या शासन निर्णयानुसार राज्यात नवीन तुती लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांची नोंदणी दि. 5 फेब्रुवारी ते 5 मार्चपर्यंत करण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांना ही नोंदणी आपले सरकार या पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे.

यासाठी आपले सरकार सेवा पोर्टल वर नोंदणी अर्ज सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ‘आपले सरकार’ पोर्टलवरून ऑनलाईन पद्धतीने करून त्याची प्रत जिल्हा रेशीम कार्यालयात जमा करावी लागणार आहे. यासाठी प्रति एकर ५०० रुपये नोंदणी शुल्क आकारले जाणार आहे.

अर्जासोबत अर्जदाराने सातबारा, ८-अ उतारा, चतुःसिमा नकाशा, आधार कार्ड, बँक पासबुक झेरॉक्स आणि दोन पासपोर्ट आकाराचे फोटो अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.

शेतकऱ्यांनी नवीन तुती लागवडीसाठी नोंदणी करण्याचे आवाहन विभागाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

रेशीम उद्योगासाठी राज्यातील वातावरण पोषक असल्याने राज्यात तुती लागवड करून शेतकरी रेशीम कोष निर्मितीपासून भरघोस उत्पन्न मिळवत आहेत.

तुती लागवडीद्वारे रेशीम कोष उत्पादन करून एक एकर क्षेत्रात दुसऱ्या वर्षापासून शेतकऱ्यांना दोन लाखांपेक्षा जास्त उत्पन्न शेतकरी मिळवत आहेत.

राज्यात मोठ्या प्रमाणावर रेशीम कोष उत्पादन होत असल्याने जालना, बीड, बडनेरा, सोलापूर, बारामती व नागपूर या ठिकाणी कोश बाजारपेठा सुरू करण्यात आल्या आहेत.

रेशीम उद्योगाला दिवसेंदिवस प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे शासनाचे धोरण या अभियानाद्वारे  साध्य होत आहे.

रेशीम लागवडीसाठी शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनामार्फत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (जी-राम-जी) अंतर्गत अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी 1 एकर तुती लागवड, जोपासना व कीटक संगोपन गृहासाठी तीन वर्षांत एकूण 895 मनुष्य दिवसांची मजुरी दिली जाते.

यामध्ये अकुशल मजुरीपोटी 2 लाख 79 हजार 240 रुपये व साहित्यासाठी 1 लाख 53 हजार रुपये असे एकूण 4 लाख 32 हजार 240 रुपयांचे अनुदान देण्यात येते.

लाभासाठी शेतकरी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मग्रारोहयो) अंतर्गत जॉब कार्डधारक असावा आणि त्याच्याकडे सिंचनाची सोय असावी.

याचबरोबर केंद्र पुरस्कृत सिल्क समग्र योजने अंतर्गत तुती लागवडीसाठी प्रति एकर ४५ हजार रुपये, सिंचन संचासाठी प्रति एकर ४५ हजार रुपये, कीटक संगोपन गृहासाठी २ लाख ४३ हजार ७५० रुपये, संगोपन साहित्यासाठी ३७ हजार ५०० रुपये व निर्जंतुकीकरण औषधांसाठी ३ हजार ७५० रुपये असे एकूण ३ लाख ७५ हजार रुपये अनुदान दिले जाते.

बहुभूधारक शेतकऱ्यांसाठी सिल्क समग्र-२ या योजनेतून २ एकर तुती लागवड करता येते. यासाठी तुती लागवड, कीटक संगोपन गृह, संगोपन साहित्य व निर्जंतुकीकरण औषधांसाठी एकूण ५ लाख  ६२ हजार ५०० रुपये अनुदान दिले जाते.

कृषी विभागाच्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत तुती लागवडीसाठी ४५ हजार रुपये, रेशीम कीटक संगोपन गृहासाठी २ लाख ४३ हजार ७५० रुपये व संगोपन साहित्यासाठी ३६ हजार ३७५ रुपये असे एकूण ३ लाख २५ हजार १२५ रुपये अनुदान दिले जाते.

पोकरा योजनेचा अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करता येणार आहे.