Grape Crop Cover Subsidy द्राक्ष बागेला क्रॉप कव्हर अनुदान योजना

गारपीट व अवकाळी पावसापासून द्राक्ष बागांचे संरक्षण व्हावे यासाठी शेतकऱ्यांना द्राक्ष बागेला प्लास्टिक कव्हर अनुदानावर दिले जाते Grape Crop Cover Subsidy

Grape Crop Cover

Grape Crop Cover Subsidy 2026

राष्ट्रीय कृषी विकास योजना (RKVY) अंतर्गत द्राक्ष पिकासाठी प्लास्टिक कव्हर तंत्रज्ञान, या आधुनिक तंत्रज्ञानामुळे द्राक्ष बागांचे संरक्षण होऊन उत्पादनाची गुणवत्ता आणि निर्यातक्षमतेत वाढ होते.

द्राक्ष हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आर्थिक बळ देणारे महत्वाचे फळपिक आहे. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस, गारपीट अशा नैसर्गिक आपत्तींना सतत सामोरे जावे लागते. त्यामुळे शेतकऱ्यांना दर्जेदार व निर्यातक्षम द्राक्ष पिकाचे उत्पादन घेण्यास मर्यादा येत आहेत.

अवेळी पाऊस व गारपीट अशा नैसर्गिक आपत्तीपासून द्राक्ष बागांच्या संरक्षणासाठी प्लास्टिक कव्हर घटकाचा शासकीय योजनेंतर्गत समावेश करण्याबाबत शेतकरी तसेच लोकप्रतिनिधींद्वारे सातत्याने मागणी होत करण्यात आल्याने या बाबीचा mahadbt farmer scheme मध्ये समावेश करण्यात आला आहे.

द्राक्ष बागेला क्रॉप कव्हर योजनेचे उद्देश

  1. प्रतिकूल नैसर्गिक परिस्थितीत गारपीट व अवकाळी पावसापासून द्राक्ष बागांचे संरक्षण करणे.
  2. उच्च दर्जाच्या व निर्यातक्षम उत्पादनासाठी आर्थिक सहाय्य
  3. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविणे
  4. ग्रामीण युवकांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करणे

द्राक्ष बागेला क्रॉप कव्हर लाभार्थी निवडीचे निकष

  1. शेतकऱ्याच्या नावावर स्वतःची जमीन असणे आवश्यक
  2. भाडेपट्टा जमीन ग्राह्य धरली जाणार नाही
  3. प्लास्टिक कव्हर तंत्रज्ञान फक्त द्राक्ष बागांसाठीच लागू
  4. MahaDBT पोर्टलवर अर्ज करणे बंधनकारक
द्राक्ष बागेला क्रॉप कव्हर अनुदान

खर्चाचे मापदंड: ₹४,८१,३४४ प्रति एकर यामध्ये अनुसूचित क्षेत्रासाठी १५% अधिक खर्च मापदंड. यामध्ये अनुदान: खर्चाच्या ५०% पर्यंत दिले जाते. क्षेत्र मर्यादा २००० ते ४००० चौ.मी. पर्यंत दिली जाते.

द्राक्ष पिकासाठी प्लास्टिक कव्हर या घटकासाठी तक्ता क्र. 1 प्रमाणे निश्चित केलेल्या तांत्रिक निकष खर्चाचे मापदंडानुसार प्रति चौ. मी. खर्चाच्या मापदंडानुसार प्रत्यक्षात वापरलेल्या साहित्याकरिता अनुदान परिगणना करावी. द्राक्ष पिकासाठी प्लास्टिक कव्हर या घटकासाठी शेतकरी तक्ता क्र. 2 प्रमाणे ऐच्छिक साहित्याचा वापर करु शकतात. त्यानुसार उपविभागीय कृषि अधिकारी यांनी प्रत्यक्षात वापरलेले ऐच्छिक साहित्याची तांत्रिक निकषांची पडताळणी करावी. देय अनुदान हे खर्चाच्या 50 टक्के रु. 2,40,672/- (अक्षरी रु. दोन लाख चाळीस हजार सहाशे बहात्तर) महत्तम मर्यादेत देय राहील.

या योजनेअंतर्गत एका लाभार्थ्यास द्राक्ष पिकासाठी प्लास्टिक कव्हर या घटकासाठी कमीत कमी 2000 चौ.मी ते जास्तीत जास्त 4000 चौ.मी. क्षेत्र मर्यादेपर्यंत लाभ घेता येईल. यापुर्वी कोणत्याही शासकीय योजनेतंर्गत (एन.एच.एम / आत्मा /आर.के.व्ही.वाय. / जलसुधार प्रकल्प / पोकरा / एन.एच. बी व इतर शासकीय योजना) लाभ घेतला असल्यास अशा सर्व प्रति लाभार्थी जास्तीत जास्त 4000 चौ.मी. क्षेत्र मर्यादेपर्यंतच अनुदान लाभ देय आहे. तसेच याबाबी करिता इतर योजनेतून शासकीय अनूदान घेतले असल्याचे/नसल्याचे लाभार्थीने हमीपत्राद्वारे (प्रपत्र 1) प्रमाणित करावे. तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी त्याची खात्री करावी.

लाभ घ्यावयाच्या सर्व लाभार्थीनी द्राक्ष पिकासाठी प्लास्टिक कव्हर या घटकासाठी उभारणीच्या तांत्रिक निकष व खर्चाचे मापदंड स्थानिक कृषि अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन / सूचना घेऊन सदर काम नोंदणीकृत उत्पादक कंपनी / पुरवठादार करावयाचे आहे. उभारणी करताना बागेच्या मुळ सांगाड्यास हानी पोहचणार नाही याची दक्षता / जबाबदारी नोंदणीकृत उत्पादक कंपनी /पुरवठादार राहील. मार्गदर्शक सुचनांमध्ये नमूद केल्यानूसार प्लास्टिक कव्हर या घटकासाठी आकारमानानुसार व निश्चित केलेल्या तांत्रिक निकषांनुसार उभारणीचा खर्च ग्राहय धरण्यात येईल.